तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||3||
तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
बुद्धं सरणं गच्छामी ||2||
कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती
पहा तुझीच चालली नभात आरती
तुला दिशा निहारती यशोधरेपरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||2||
तुझ्यामुळेच जाहला अखेर फैसला
दिलास धीर तोडल्या आम्हीच शृंखला
आता भविष्य आमुचे असे तुझ्या करी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||2||
तुलाच दुःख आमुचे तथागता कळे
तुझीच सांत्वना अम्हा क्षणोक्षणी मिळे
निनाद पंचशीलचा घुमे घरोघरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||2||
तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला
तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला
तुझेच सत्य यापुढे लढेल संगरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||2||
तुझ्यासमान एकही नसे तुझ्याविना
सदैव यापुढे करू तुझीच वंदना
भरेल अमृतापरी तुझीच वैखरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी ||2||
तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
बुद्धं सरणं गच्छामी ||3||